आता ट्विटरवर छेडछाड केलेल्या व्हिडीओ खाली दिसणार ‘Manipulated Media’ लेबल

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने काही दिवसांपुर्वी सांगितले होते की फेक न्यूज, माहिती रोखण्यासाठी छेडछाड केलेल्या व्हिडीओला लेबल लावले जाईल, जेणेकरून व्हिडीओमधील माहिती चुकीची असल्याची अथवा त्यात बदल केल्याचे इतर युजर्सच्या लक्षात येईल. आता ट्विटरने याची सुरूवात अमेरिकेचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बिडन यांच्या एका व्हिडीओपासून केली आहे.

जो बिडन यांचा एक छेडछाड केलेला व्हिडीओ व्हाइट हाउसचे सोशल मीडिया डायरेक्टर डॅन स्कॅव्हिनो यांनी शेअर केला होता. विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.

जो बिडन यांचे चुकीचे वाक्य असलेले छेडछाड केलेला व्हिडीओ शेअर केल्यानंतर ट्विटरने आपल्या नवीन पॉलिसी अंतर्गत या व्हिडीओखाली Manipulated Media लेबल लावले आहे.

ही नवीन पॉलिसी 5 मार्चपासून लागू करण्यात आली असून, या अंतर्गत कोणाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न, व्हिडीओमध्ये छेडछाड केली असल्यास हे लेबल दिसेल. सध्या हे लेबल सर्व युजर्सला दिसत नाही.

याबाबत ट्विटरने म्हटले आहे की, जेव्हा हा व्हिडीओ तुमच्या टाईमलाईनवर आपोआप येईल, तेव्हाच हे लेबल दिसेल. कंपनीच्या या नवीन पॉलिसीमुळे फेक व्हिडीओ ओळखण्यास मदत होईल.

Leave a Comment