यंदाचे लीप इअर शेवटचे ठरणार?


फोटो सौजन्य पत्रिका
दर चार वर्षांनी आपण लीप इअर साजरे करतो. या लीप इअरमध्ये फेब्रुवारीमध्ये २८ ऐवजी २९ दिवस असतात. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे भ्रमण, त्यासाठी लागणारा वेळ यांच्यात ताळमेळ बसविण्यासाठी लीप इअरचे डिझाईन केले गेले होते. पृथ्वी सूर्याभोवती ९४ कोटी किमीचा प्रवास करून एक प्रदक्षिणा ३६५ दिवसात पूर्ण करते. पण त्यासाठी वर आणखी ५ तास ४८ मिनिटे आणि ४६ सेकंद लागतात. हा जादाचा वेळ दर चार वर्षांनी २४ तासाचा होतो म्हणून फेब्रुवारीत चार वर्षांनी २९ दिवस येतात. पण नवीन कॅलेंडरनुसार यंदाचा २९ दिवसांचा फेब्रुवारी शेवटचा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अमरिकेतील जॉन हॉपकिन विद्यापीठातील अर्थशास्त्री स्टीव हँके आणि खगोलशास्त्रज्ञ रिचर्ड कॉन हेन्री यांनी नवीन कॅलेंडर विकसित केले आहे. हे कॅलेंडर यशस्वी ठरले आणि जगभर त्याचा स्वीकार केला गेला तर यापुढे लीप इअर येणार नाही असे समजते. त्यात नव्या पद्धतीने कालगणना केली गेली आहे. नवीन कालगणनेनुसार वर्षात ३६४ दिवसच ठरले गेले आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षाची सुरवात सोमवारीच होणार आहे. तसेच फेब्रुवारीत ३० दिवस असतील. जानेवारी, एप्रिल, मे, जुलै, ऑगस्ट आणि ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ३० दिवस येतील तर बाकी महिने ३१ दिवसांचे असतील. तरी प्रत्येक पाच सहा वर्षाच्या अखेरीस पूर्ण एक आठवडा जास्तीचा असेल.

आजचे कॅलेंडर तयार होण्यास शेकडो वर्षे खर्च करावी लागली होती. ज्युलीएस सीझरने रोमन गणराज्यासाठी ३६५ दिवसांचे कॅलेंडर लागू केले मात्र रोमन कॅथोलिक देशांबाहेर या कॅलेंडर ला मान्यता मिळायला खूप वर्षे जावी लागली. ब्रिटन मध्ये तर त्यावरून दंगे उसळले होते असेही सांगतात.

हेन्री यांच्या म्हणण्याप्रमाणे नवीन कॅलेंडर आर्थिक दृष्टीनेही फायद्याचे ठरणार आहे. कारण या कॅलेंडरमुळे साप्ताहिक सुट्ट्या आणि सरकारी सुट्ट्या याच्यात टक्कर होणार नाही. त्यामुळे पैशाची बचत होईल. हेन्री म्हणतात नवे कॅलेंडर फक्त अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प हेच लागू करू शकतील कारण त्यांना ज्युलियस सीझर प्रमाणे आपल्या नावावर कॅलेंडर असणे नक्कीच आवडेल.