करोनाशी दोन हात करण्यास भारतीय सेना तयार


फोटो सौजन्य क्विंट
चीनमधून फैलाव झालेल्या करोनाने आता भारतात दस्तक दिली असताना या विषाणूचा धोका लक्षात घेऊन भारत सरकारने भारतीय सेनेच्या जल, थल आणि आकाश सेनेला करोनाच्या संभावित हल्ल्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय सेनेच्या तिन्ही दलांमध्ये करोनाच्या संभावित रुग्णांना आयसोलेशन मध्ये ठेवण्याची सोय केली जात असून २५०० लोकांसाठी ही सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचे समजते.

दिल्ली, आंध्र, राजस्थान आणि केरळ मध्ये करोनाची लागण झालेले रुग्ण आढळले असून उत्तर प्रदेशात नवीन ६ संभावित लोक मिळाले आहेत. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले गेले आहेत. भारतीय सेनेच्या रुग्णालयात असे संशयित पूर्ण वेळ बाकी लोकांपासून वेगळे राहू शकणार आहेत त्यामुळे त्याच्यापासून या रोगाचा फैलाव होण्याची शक्यता राहणार नाही असे सांगितले जात आहे. या रुग्णावर लक्ष ठेवणेही सोपे जाणार असल्याने ही व्यवस्था केली जात आहे.

दरम्यान आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे भारतीय नौसेनेतर्फे आयोजित केला जाणारा बहुपक्षीय नौसेना सराव सध्या रद्द केला गेला आहे. या सराव शिबिरासाठी ४२ देशातील नौसेना अधिकारी येणार होते. त्यात अमेरिका रशिया यांचाही समावेश होता. मात्र कोरोना प्रकोप लक्षात घेऊन हा सराव पुढे ढकलला गेला असल्याचे जाहीर केले गेले आहे.

Leave a Comment