रोल्स राईसमधून फिरण्याचे स्वप्न करा साकार


फोटो सौजन्य समयम तमिळ
रोल्स राईस ही कार नुसती लग्झरी कार नाही तर ती स्टेटस सिम्बॉल म्हणूनही ओळखली जाते. श्रीमंत व्यक्ती सुद्धा ही कार खरेदी करताना विचार करतात तेथे सर्वसामान्य माणूस या कार मधून फिरायचे स्वप्न सुद्धा पाहण्यास कचरेल यात नवल नाही. पण केरळ मध्ये आता रोल्स राईस फँटम टॅक्सी मध्ये बसून कुणीही या कारची सवारी करू शकणार आहे. त्यासाठी फक्त ऑक्सिजन रिसोर्टचे तीन दिवसांचे पॅकेज घ्यावे लागेल. अर्थात त्यासाठी २५ हजारापेक्षा अधिक खर्च येणार नाही.

केरळमधील उद्योजक बॉबी चेम्नूअर यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली असून ते ऑक्सिजन रिसोर्टचे मालक आहेत. त्यांनी नुकतेच रोल्स राईस फँटम कारचे कमर्शियल वाहनात रुपांतर करून घेतले असून या गाडीसाठी पिवळ्या रंगाची नंबर प्लेट घेतली आहे. हॉलिडे प्लान मध्ये अश्या प्रकारच्या लग्झुरीअस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बॉबी प्रसिद्ध आहेत. त्यांनी या रोल्स राईस फँटमला सोनेरी रंगात रंगवून घेतले आहे. त्यामुळे ही कार आणखी आकर्षक बनली आहे.

बाजारात रोल्स राईस फँटमच्या या मॉडेलची किंमत ९.५ ते ११.२५ कोटी दरम्यान आहे. मात्र बॉबी यांनी ही कार लिलावात खरेदी केली आहे. रोल्स राईस मधून फिरण्याचे लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बॉबी यांनी या कारची पिकअप आणि ड्रॉप सर्विस सुरु केली आहे. या सेवेतून त्यांना कोणताही नफा काढायचा नाही असेही समजते. पिवळी नंबर प्लेट लावलेल्या या रोल्स राईस फँटमचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे टॅक्सी सेवा देणारी ही सर्वात महाग कार ठरली आहे.

Leave a Comment