
नवी दिल्ली – सोमवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजपतून हकालपट्टी करण्यात आलेले स्वामी चिन्मयानंद यांना जामीन मंजूर केला. स्वामी चिन्मयानंद यांना या प्रकरणात गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. संबंधित विद्यार्थिनीने आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप केला होता.
बलात्कार प्रकरणी स्वामी चिन्मयानंद यांचा जामीन मंजूर
उत्तर प्रदेशातील शहाजहांपूरमधील चिन्मयानंद यांच्याच एका विधी महाविद्यालयात पीडित विद्यार्थिनी पदवी शिक्षण घेत आहे. चिन्मयानंद यांच्यावर या प्रकरणात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३७५ सी (पदाचा गैरवापर करून लैंगिक शोषण) ३५४ डी (मारहाण), ३४२ आणि ५०६ (गुन्हेगारी कृत्य) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले आहे. याच पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला जातो आहे. २३ ऑगस्ट २०१९ रोजी एका महिलेने या प्रकरणी व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओमध्ये एका पक्षाचा नेता तिला त्रास देत असून, मारण्याची धमकी देत असल्याचे तिने म्हटले होते.
