दुखापतग्रस्त रोहित शर्मा उर्वरित न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर


नवी दिल्ली – 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेत न्यूझीलंडच्या दौर्‍यावर असलेल्या भारतीय संघाने 5-0 असा विजय मिळवला खरा, पण भारताचा तडाखेबाज फलंदाज रोहित शर्माला शेवट्या सामन्यात गंभीर दुखापत झाली आहे. रोहित शर्मा दुखापतीमुळे एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. तसेच रोहित शर्मा याच्या जागेवर कोणत्या खेळाडूला संधी देण्यात येणार? याची भारतीय प्रक्षेकांना उत्सुकता आहे. तर न्यूझीलंड ए विरोधात दुहेरी शतक झळकावणारा शुभमन गिल याला संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे.

रोहित शर्माला भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील अखेरच्या टी -20 सामन्यात फलंदाजी करताना गंभीर दुखापत झाली. मैदानात असताना रोहित शर्माला डाव्या पायाला वेदना जाणवत होत्या. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यावेळी दोघाजणांनी त्याला पकडून त्याला ड्रेसिंग रुममध्ये नेले होते. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करण्यासाठी देखील रोहित शर्मा मैदानात आला नव्हता. मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने ट्रॉफीसह फोटो काढत असताना रोहित शर्माच्या डाव्या पायाला पट्टी दिसली होती.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंड संघासोबत होणाऱ्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत रोहीत शर्मा खेळणार नसल्याची माहिती दिली आहे. तथापि, रोहित शर्माच्या जागी एकदिवसीय मालिका आणि कसोटी मालिकेमध्ये कोणाला संधी मिळणार? याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Leave a Comment