मनसे नेते अमित ठाकरेंचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांकडून अभिनंदन


मुंबई : सक्रीय राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांची एन्ट्री झाली आहे. अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात नेतेपदी निवड करण्यात आली. अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करत असल्याची घोषणा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली. अमित ठाकरे यांनी यावेळी वडील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. काल संध्याकाळी आपल्याला राज ठाकरे यांनी ठराव मांडण्यासंदर्भात सांगितले. त्यावेळी माझ्या पायाखालची जमीन सरकल्या सारखे वाटल्याचे यावेळी अमित ठाकरे यांनी सांगितले. मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी एकच जल्लोष केला. याआधी जे प्रेम, प्रतिसाद दिला तो यापुढेही द्याल अशी अपेक्षा त्यांनी मनसे कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली.


यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त आमदार रोहित पवार यांनी अमित ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल अमित राज ठाकरे यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी जनतेच्या व राज्याच्या हितासाठी गरज असेल तिथे मित्र म्हणून व्यक्तीगत पातळीवर एकमेकांना कायमच सहकार्य राहील, असे म्हटले आहे.

अनेक राजकीय घराण्यातील तरुण पिढी महाराष्ट्राच्या राजकाणात उतरत आहे. पवार कुटुंबातून पार्थ पवार, रोहित पवार, देशमुख कुटुंबातून धीरज देशमुख, अमित देशमुख, ठाकरे कुटुंबातील तिसरी पिढी आदित्य ठाकरे आणि आता अमित ठाकरे, प्रणिती शिंदे, आदिती तटकरे असे अनेक युवा नेते आता राजकारणात सक्रिय झाले आहेत. अमित ठाकरे यांची राजकारणात एन्ट्री कधी होणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. आज मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

Leave a Comment