मनसेच्या झेंड्याच्या भगवेकरणामागे शरद पवारांचे डोके, भाजपचा दावा


मुंबई : मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडत असून मनसेच्या नव्या झेंड्याचे या अधिवेशनात अनावरण करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिवेशनाचे उद्घाटन झाल्यानंतर नव्या ध्वजाचे अनावरण केले. सध्या राजकीय वर्तुळात मनसेच्या नव्या भगव्या झेंड्याची चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवारांचे डोके मनसेच्या झेंड्याच्या भगवेकरण करण्यामागे असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केला आहे.

शरद पवारांनी हिंदू मतांच्या विभाजनासाठी चाणाक्षपणे मनसेचा वापर केला. राज ठाकरेंचा शरद पवारांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वापर केला, असा गंभीर आरोप हाके यांनी केला. दुर्दैवाने शिवसेना हिरवी झाली, म्हणून मनसे भगवी होत आहे. राज ठाकरेंना हिंदूधर्म किंवा महाराष्ट्र धर्माच्या नावाखाली शक्ती देण्याचे काम शरद पवार करत आहेत. पण भाजपचे यामुळे नुकसान होईल, असे कुणाला वाटत असेल ते चुकीचे असल्याचा टोलाही गणेश हाके यांनी लगावला आहे.

झेंड्याच्या रंग बदलण्याचा मनसेचा प्रयोग फेल जाणार आहे. वैचारिक गोंधळ असलेले तकलादू मित्र भाजपला नको आहेत. आम्ही कार्यकर्त्यांच्या जीवावर देशात आणि राज्यात मोठे होऊ शकतो. मनसे आणि भाजप यांच्या कामात मतभेद आहेत. आमचा विचार मनसेने स्वीकारला तर मैत्रीबाबत विचार करू, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असल्याची आठवण हाके यांनी करुन दिली. वंचित बहुजन आघाडी भाजपची टीम बीचा प्रयोग करण्याची गरज नाही. पण राष्ट्रवादीची बी टीम म्हणून मनसे काम करत असल्याचा आरोप हाके यांनी केला.

Leave a Comment