
नवी दिल्ली – ‘हिंदू रक्षा दल’ या हिंदूत्ववादी संघटनेने रविवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारली असून विद्यार्थ्यांना मारहाण करणारे आपले कार्यकर्ते असल्याचे दलाचा अध्यक्ष भूपेंद्र उर्फ पिंकी चौधरी याने स्पष्ट केले आहे आणि यापुढे देखील देशाचे खाऊन परक्यांचे गीत गाणाऱ्या विद्यार्थ्यांवर असे हल्ले करत राहू, अशी धमकीही त्याने दिली आहे.
जेएनयू हल्ल्याची जबाबदारी हिंदू रक्षा दलाने स्वीकारली
पोलीस जेएनयूमध्ये मारहाण आणि संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी चौकशी करत असून तोंड झाकलेल्या सर्व हल्लेखोरांच्या फोटोंवरून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यादरम्यानच, हिंदू रक्षा दलाने या घटनेची जबाबदारी घेतली आहे. भूपेंद्र चौधरी याने दावा केला आहे की, जेएनयूमध्ये शिकणारे विद्यार्थी देशद्रोही कारवायांमध्ये सहभागी आहेत. काही दिवसांपासून ते जास्त वेगाने काम करत असल्यामुळे दलाच्या कार्यकर्त्यांना हे पाऊल उचलावे लागले. ते असे हल्ले यापुढेही करत राहणार असल्याची धमकीही त्याने दिली आहे.
