उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेला नराधमांनी जिवंत पेटवले


लखनऊ – उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणातील नराधमांनी जामिनावर तुरूंगातून बाहेर येत पीडितेला गुरुवारी सकाळी जिवंत पेटवले. 90 टक्के पीडिता भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. लखनऊ ट्रामा सेंटरमध्ये तिला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले आहे. आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभमने हे कृत्य केले आहे. पोलिसांनी शुभम आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे. इतर तिघे आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे उन्नाव पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी ही घटना हिंदुनगर पोलिस स्टेशन परिसरात घडली आहे. रायबरेली न्यायालयात पीडिता बलात्कारप्रकरणी सुनावणीसाठी जात होती. ती रेल्वे पकडण्यासाठी पायी निघाली होती. तिच्या पाळतीवर असलेल्या आरोपी शुभम आणि शिवम त्रिवेदी आणि त्यांचे तीन साथीदारांनी पीडितेला अडवले. तिला काही समजण्याच्या आत तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. पीडिता यात गंभीर भाजली असून पीडितेने दिलेल्या जबाबात आरोपींची नावे सांगितली आहे. आरोपी शुभम त्रिवेदी आणि त्याचे वडील हरिशंकर त्रिवेदी यांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर तिघे आरोपी फरार आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान बलात्कार प्रकरणात दोन दिवसांपूर्वी शुभम आणि शिवम जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते.

दरम्यान, शिवम आणि त्याचा मित्र शुभम त्रिवेदीने 12 डिसेंबर 2018 रोजी लग्न करण्याच्या बहाण्याने मंदिरात घेऊन पीडितेवर सामुहिक बलात्कार केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर बिहार पोलिसांनी आरोपी शिवम आणि शुभम त्रिवेदला अटक करून तुरुंगात डांबले होते. शिवम त्रिवेदी याच्यासोबत पीडितेचे प्रेमसंबंध होते. रायबरेली येथे नेऊन शिवमने तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. यानंतर तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने रायबरेली येथे एका खोली बंद केले होते.