शरद पवारांनी धुडकावली होती मोदींची ऑफर


मुंबई – मला महाराष्ट्रात एकत्र येऊन काम करण्याची ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती, पण ती ऑफर मी धुडकावल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. मोदींची नव्हे, तर अमित शहांची मला चिंता होती. मी त्यांच्यापासून सावध होतो. अमित शहांचा महाराष्ट्रातील डाव आमची बुद्धिमत्ता, आक्रमकता व जनाधारामुळे फसल्याचेही पवारांनी स्पष्ट केले.

शरद पवार पुतणे अजित पवार यांच्या बंडाच्या प्रश्नावर म्हणाले, एक दिवस अजित पवार मला बोलले की देवेंद्र फडणवीस मला बोलावत आहेत. काही त्यांना बोलायचे आहे. राजकारणात सर्वपक्षीयांशी संवाद असायलाच हवा, असा विचार करून मी अजित पवार यांना फडणवीसांना भेटण्याची परवानगी दिली. पण देवेंद्र फडणवीसांना अजित यांनी सांगितले की, तुम्ही आजच शपथविधी करणार असाल तर मी काहीही करू शकतो. शेवटी दोघांनीही मंत्रिपदांची शपथ घेतली. ते असे पाऊल उचलेतील, असा विचारही मी केला नव्हता. माझा पाठिंबा त्यांच्या भूमिकेला होता, ही चर्चा पूर्णत: चुकीची आहे.

मला सकाळीच फडणवीस व अजित यांच्या शपथविधीची बातमी कळली तेव्हा धक्काच बसला. त्या वेळी आमचे काही आमदारही अजित पवारांसोबत उपस्थित असल्याचे कळले. त्यांची नावे माहीत करून घेतली, तेव्हा विश्वास होता की माझ्या शब्दाचा मान ठेवून ते परत येतील. तसेच महाविकास आघाडीचे सरकार प्रभावी ठरेल, याचाही विश्वास होता. किती तत्परतेने पंतप्रधान, राष्ट्रपती व राज्यपाल काम करतात, हेही या घटनेच्या निमित्ताने कळून चुकले. सकाळी ६ वाजता या घडामोडी झाल्या, हे ऐकून माझा तर विश्वासच बसला नव्हता.

Leave a Comment