
मुंबई : बॉलिवूडमधील मोठे प्रोडक्शन हाऊस असलेल्या ‘यशराज फिल्म्स’विरोधात 100 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. ‘द इंडियन परफॉर्मिंग राईट्स सोसायटी’ (IPRS)च्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक फसवणूक प्रकरणी यशराज फिल्म्सविरोधात गुन्हा दाखल
गीतकार, संगीतकार, गायक आणि संगीत निर्मात्यांचे IPRS ही संस्था प्रतिनिधित्व करते. IPRS द्वारे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, काही कलाकारांना संशयास्पद करारांवर स्वाक्षरी यशराज फिल्म्सने करण्यास भाग पाडले आणि रेडियो स्टेशन्स, संगीत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरुन मानधन घेण्यासही त्यांना मज्जाव केला.
प्राथमिक तपास आणि पुराव्यांच्या आधारे यशराज फिल्म्स आणि त्यांचे सर्वेसर्वा असलेले आदित्य चोप्रा, तसेच उदय चोप्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास सुरु असून आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा यांना गरज पडल्यास चौकशीसाठी बोलावण्यात येईल, अशी माहिती या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्याने दिली. त्याचबरोबर इतर कुठलेही प्रोडक्शन हाऊस आणि स्टुडिओ जर अशा प्रकारच्या प्रकरणात गुंतलेले आढळलं, तर त्यांचीही चौकशी केली जाईल, असेही अधिकारी म्हणाले.
