
(source)
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने आज कर्नाटकामधील विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलेले काँग्रेस आणि जेडीएसचे १७ आमदार पोटनिवडणूक लढवू शकतात, असा निर्णय दिला आहे. १७ आमदारांना कर्नाटक विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष आर. के. रमेश कुमार यांनी अपात्र ठरवल्यानंतर त्या सर्व आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
कर्नाटकातील ते अपात्र १७ आमदार लढवू शकतात पोटनिवडणूक – सर्वोच्च न्यायालय
न्यायाधीश एन व्ही. रामन्ना यांनी विधानसभा अध्याक्षांचा निर्णय योग्य असल्याचे सांगत ते आमदार पोटनिवडणुका लढवू शकतात, असा निर्णय देण्यात आला आहे. १३ महिन्यांचे काँग्रेस- जेडीएस सरकार १७ आमदारांच्या राजीनाम्यानंतर अडचणीत आले होते. कुमारस्वामी यांना बहुमता अभावी मुख्यमंत्री पदावरून उतार व्हावे लागले होते. त्यानंतर भाजपने कर्नाटकात सत्ता स्थापन केली.
जुलै महिन्यात कर्नाटकमध्ये हा सत्तापेच सुरु होता. राजीनामा दिलेले आमदार महाराष्ट्रातही काही दिवस मु्क्कामाला होते. कुमारस्वामी सरकारला विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करता आले नाही. त्यामुळे त्यांना राजीनामा दिल्यानंतर बी. एस. येडियुरप्पा यांनी सरकार स्थापन केले.
