
स्वीडन – गेल्या काही दिवसांपासून स्विडीश संसदेबाहेर करत असलेल्या आंदोलनासाठी पर्यावरण विषयक कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग चर्चेत आहे. नुकतेच संयुक्त राष्ट्र संघात तिने उभ्या केलेल्या आंदोलनानंतर तिचे विचार मांडण्यासाठी आमंत्रितही करण्यात आले होते. राजकीय स्तरावर हवामान बदलाविषयी तातडीने पावले उचलण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल 16 वर्षीय ग्रेटाला ‘राईट लाईव्हलीहूड’ या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ‘प्रतिनोबेल’ म्हणून या पुरस्काराला ओळखले जाते.
ग्रेटा थनबर्गचा होणार ‘प्रति नोबेल’ पुरस्काराने सन्मान
ग्रेटाला नोबेल शांतता पुरस्कारासाठीही नामांकन देण्यात आले आहे. ग्रेटाविषयी बोलताना पुरस्कारकर्त्यांनी म्हटले आहे की, प्रत्येकात बदल घडवून आणण्याची शक्ती आहे. त्याचेच एक उदाहरण ग्रेटा आहे. तिच्यामुळे राजकीय पातळीवर पर्यावरणविषयक प्रश्नांना उपस्थित करण्यास सर्व स्तरातील लोकांना बळ मिळेल.
या पुरस्काराची सुरुवात 1980 साली झाली. नोबेल पुरस्कारांपासून दुर्लक्षित राहिलेल्या लोकांना सन्मानित करण्यासाठी स्विडिश-जर्मन नागरीक असलेले परोपकारी जकोब वॉन यूक्सकुल यांनी या पुरस्काराची सुरुवात केली होती. दरवर्षी चार विजेत्यांना बक्षीस म्हणून प्रत्येकी दहा लाख क्रोनर (जवळपास 73 लाख रूपये) दिले जातात. 4 डिसेंबरला म्हणजेच नोबेल पारितोषिक वितरणाच्या सहा दिवस आधी स्टॉकहोम येथे हा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
