
मुंबई : लवकरच पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक तारखांची घोषणा निवडणूक आयोग करणार आहे. राज ठाकरे यांची मनसे निवडणूक तोंडावर असतानाच मात्र ही निवडणूक लढवायची की नाही, याच संभ्रमात आहेत. पण आज बोलावण्यात आलेल्या बैठकीत मनसेचे पदाधिकारी निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे.
राज ठाकरे लढवणार विधानसभा निवडणूक!
आघाडी आणि युतीच्या गोटात निवडणूक जवळ आल्याने जोरदार हालचाली सुरू आहेत. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे याबाबत शांत असल्याचे दिसत होते. त्यानंतर विधानसभेसाठी मनसेच्या विभागप्रमुखांची बैठक आता राज ठाकरे यांनी बोलावली आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. काही जागांवर मनसे आपले उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. राज ठाकरेंनी ही बैठक मनसेचे कार्यालय राजगड येथे बोलवली आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी यापूर्वी मनसे नेत्यांच्या निवडणूक लढवण्याबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या. त्यानंतर आता विभागप्रमुखांना भेटून राज ठाकरे निवडणुकीबाबतची चाचपणी करत आहेत. पण मनसे निवडणूक लढणार की नाही हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
