सुधारित यूएपीए कायद्यानुसार अझहर, दाऊद, लख्वी आणि सईद दहशतवादी


नवी दिल्ली – मसूद अझहर, दाऊद इब्राहिम, हफिज सईद आणि झाकिर उल रेहमान लख्वी यांना केंद्रातील मोदी सरकारने दहशतवादी घोषित केले असून ही कारवाई या वर्षी नव्याने सुधारणा करण्यात आलेल्या बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) करण्यात आली आहे. आता कोणत्याही व्यक्तीला या कायद्यानुसार दहशतवादी घोषित करता येते.

केंद्र सरकारने मागील महिन्यात यूएपीए कायद्यात सुधारणा केल्यानंतर प्रथमच हा निर्णय घेण्यात आला. या कायद्यातील सुधारणेपूर्वी फक्त संघटनेला दहशतवादी घोषित करता येत होते. पण आता व्यक्तीलाही दहशतवादी घोषित करता येते. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी चौघांना दहशतवादी घोषित केल्याची नोटीस जारी केली आहे.

रेड नोटीस या चारही दहशतवाद्यांविरोधात जारी करण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरवर ५ दहशतवादी कारवाया संदर्भातील गुन्हे नोंदवण्यात आले असून यात फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्ला घडवून आणल्याचा खटला दाखल्याचा देखील समावेश आहे.

लष्कर ए तैयबा संघटनेचा हाफिज सईद आणि झाकिर उल लख्वी यांच्यावर ४ दहशवादी गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मुंबई हल्ल्याचा समावेश आहे. तर दाऊद इब्राहिमवर मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या साखळी बॉबस्फोट प्रकरणी दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.

Leave a Comment