
अजमेर – राजस्थान पोलिसांनी २६ वर्षीय पत्नीचा छळ करुन तिला ट्रिपल तलाक दिल्याप्रकरणी अजमेर दर्ग्याच्या ६० वर्षीय केअरटेकरला अटक केली आहे.
२६ वर्षांच्या पत्नीला तलाक देणाऱ्या अजमेर दर्ग्याच्या ६० वर्षीय केअरटेकरला अटक
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमेर दर्ग्याच्या केअरटेकरचे नाव सलिमुद्दीन असे असून त्याच्या पत्नीने मंगळवारी रात्री दर्गा पोलिसांत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केली. पोलिसांनी भादंवि कलम ४९८-अ नुसार याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. त्यानंतर ट्रिपल तलाक कायद्यानुसार, त्याच्यावर काय कारवाई करता येईल याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे.
२०१७ मध्ये २६ वर्षीय मुलीशी ६० वर्षांच्या सलिमुद्दीनने विवाह केला होता. त्याने लग्नानंतर महिन्याभरातच पत्नीचा छळ करायला सुरुवात केली होती. तिला त्याने ट्रिपल तलाक देऊन टाकला. या प्रकरणी आम्ही तक्रार दाखल करुन घेतली आहे. पण नव्या ट्रिपल तलाकविरोधी कायद्यातील कोणत्या तरतुदींनुसार त्यावर कारवाई करावी याबाबत आम्ही कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत असल्याचे पोलीस अधिकारी हेमराज यांनी सांगितले.
