
वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यात एका गर्भवती महिलेची चक्क धावत्या बाइकवर प्रसुती झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी चित्रकूट जिल्ह्यातील कलवार बुजुर्ग गावात घडल्याची माहिती आहे.
चक्क चालत्या बाइकवर महिलेची प्रसुती
कलवार बुजुर्ग गावातील कुशल विश्वकर्मा यांच्या पत्नीला मंगळवारी दुपारच्या सुमारास प्रसुतीकळा सुरु झाल्या. टोल फ्री क्रमांक 102 आणि 108 क्रमांकावर त्यावेळी रुग्णवाहिकेसाठी फोन केला, पण रुग्णवाहिका दोन तास उलटल्यानंतरही आली नाही. कुटुंबियांनी अखेर दुचाकीवरुन महिलेला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला, महिलेने बाइकवरुन रुग्णालयात जात असताना रुग्णालयापासून अवघ्या 40 मीटर अंतरावर असताना बाइकवरच बाळाला जन्म दिल्याची माहिती आरोग्य केंद्राचे चिकित्साधिकारी डॉ. ध्रुव कुमार यांनी माहिती दिली.
आई आणि बाळाला सध्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती उत्तम असल्याचेही त्यांनी सांगितलं. यासंदर्भातील वृत्त ‘आजतक’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. महिलेने चालत्या बाइकवर बाळाला जन्म देताच सोबत बसलेल्या सासूला जोरात आवाज दिला. बाइक थांबताच नवजात बाळासह ती बाइकवरुन पडल्यामुळे दोघेही किरकोळ जखमी झाल्याचे ‘आजतक’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
