
मुंबई – नव्या रेपो रेटची घोषणा करताना आरबीआयच्या पतधोरण समितीने त्यात ०.३५ टक्क्यांची कपात केली आहे. आरबीआयने सलग चौथ्यांदा रेपो रेटमध्ये कपात केल्याने बँकांच्या कर्जाचे दर आणखी स्वस्त होणार आहेत. आरबीआयच्या नव्या पतधोरणानंतर रेपो रेट हा ०.३५ टक्क्यांनी कमी म्हणजे ५.७५ टक्क्यावरून ५.४० टक्के एवढा होणार आहे.
रेपो रेटमध्ये ०.३५ टक्क्यांची कपात
५ ते ७ ऑगस्ट दरम्यान चालू वर्षातील तिसरी पतधोरण समितीची बैठक पार पडली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आरबीआयच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीचे अध्यक्ष आहेत. रेपो रेटमधील कपातीची घोषणा त्यांनी केली आहे.
रेपो रेटमध्ये कपात करण्यासाठी पतधोरण समितीमधील सर्व सहा सदस्यांनी सहमती दर्शविली. आरबीआयने मंदावलेली अर्थव्यवस्था या पार्श्वभूमीवर रेपो रेटच्या कपातीचा निर्णय घेतला आहे. चलनाची तरलता वाढविणे आणि रेपो रेटमधील कपातीचा ग्राहकापर्यंत फायदा मिळवून देण्यासाठी आरबीआयने पावले उचलावीत, अशी तज्ज्ञांची अपेक्षा आहे.
