चांद्रयान २ ने अवकाशातून टिपले पृथ्वीचे विहंगम दृश्य


नवी दिल्ली – चंद्राकडे भारताच्या अंतराळ संस्था असलेल्या इस्रोचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान २ मिशन यशस्वीपणे मार्गक्रमण करत असून नुकतेच पृथ्वीचे पहिले छायाचित्र चांद्रयानाने टिपले आहे. एलआय ४ या कॅमेऱ्याने हे छायाचित्र ३ ऑगस्टला टिपले असल्याची माहिती इस्त्रोने ट्विटरद्वारे दिली आहे.


चांद्रयान-2 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून अवकाशात झेपावले आहे. चांद्रयान-२ चंद्रावर लॉन्चिंगनंतर ५४ दिवसाने म्हणजेच ५ सप्टेंबरला पोहचणार आहे. केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष इस्रोच्या या वाटचालीकडे लागले आहे.

‘इस्रो’ चांद्रयान-१ च्या यशानंतर अवघ्या दहा वर्षांत चांद्रयान-२’ च्या निमित्ताने दुसऱ्यांदा चंद्रावर स्वारी करणार आहे.

संपूर्ण स्वदेशी बनावटीचे भारताचे चांद्रयान -२ हे यान आहे. या मोहिमेसाठी भारताला एकूण ९७८ कोटी रुपये एवढा खर्च आला आहे.

‘नासा’ने याआधी १९६९ मध्ये अपोलो हे यान चंद्रावर पाठवले होते. चांद्रयान-१ आणि मंगलयानच्या यशानंतर भारतच्या या मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे.