
बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) चांद्रयान-2 हे त्याच्या दुसऱ्या कक्षेत पुढे गेले असून ते चंद्राच्या आणखी जवळ पोहोचल्याची माहिती दिली आहे. यानाने रात्री साधारण एक वाजून आठ मिनिटांनी दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला. प्रणोदन यंत्रणेचा वापर यासाठी झाला असून 15 मिनिटांचा वेळ त्याला लागला. या यानाने प्रयत्नानंतर 251 X 54,829 किमी च्या कक्षेत प्रवेश केला. चांद्रयानाच्या सर्व गतिविधी या व्यवस्थित असल्याचेही सांगण्यात आले.
चंद्राच्या आणखी जवळ यशस्वीरित्या पोहचले ‘चांद्रयान 2’
29 जुलैला दुपारी चांद्रयान-2 हे तिसऱ्या कक्षेत प्रवेश करेल. चंद्रावर अंतराळ यान एक मून लॅंडर आणि रोवरच्या मदतीने पाठविण्याच्या योजनेला 22 जुलैला प्रत्यक्षात सुरुवात झाली. संपूर्ण भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही एम के ३ या प्रक्षेपकाने उड्डाणानंतर बरोबर १५ मिनिटांनी चांद्रयानाला त्याच्या नियोजित कक्षेत नेऊन सोडले आणि नियंत्रणकक्षेतील शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांच्या ताणलेल्या चेहऱ्यांवर पहिले हास्य उमटले. सुमारे ४८ दिवसांत अवकाशात झेपावलेलं हे चांद्रयान चंद्रावर पोहोचणार आहे. चांद्रयान ६ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान चंद्रावर पोहोचेल, असा अंदाज आहे. पुढचे काही दिवस या चांद्रयानासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.
