‘हंबीरराव मोहिते’ यांचा जीवनप्रवास उलगणार प्रवीण तरडे


गेल्या दशकभरात मराठी चित्रपटसृष्टीने त्यांचे विषय आणि मांडणी यांच्याबाबतीत कात टाकत अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत, यामुळेच मराठी चित्रपटाचा डंका आज फक्त भारतातच नाही तर जगातही वाजत आहे. असाच नव्या धाटणीच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने काही महिन्यांपूर्वी राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले होते. बॉक्स ऑफिसवरील या चित्रपटाच्या यशस्वी घोडदौडीनंतर प्रेक्षकांना प्रवीण तरडे यांच्या पुढच्या चित्रपटाची उत्सुकता होती. पण ती उत्सुकता आता संपली आहे, ते लवकरच शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

त्यांनी फेसबुकवर एका पोस्टद्वारे काही फोटोज पोस्ट केले आहेत. या पोस्टवरून दिसत आहे की, सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाच्या लोकेशन रेकी आणि ड्रोन शुटिंगला सुरुवात झाली असून, प्रेक्षकांना 2020 मध्ये एक ऐतिहासिक नजराणा पाहायला मिळणार आहे. प्रवीण यांनी काही दिवसांपूर्वी तुटुन पडला जरी हात, नाही सोडली तलवारीची साथ….’ अशी टॅगलाइन असलेले पोस्टर पोस्ट केले होते. मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वात भव्यदिव्य आणि महागडा हा चित्रपट असणार आहे.