
आपल्याला चित्रपटाच्या पडद्यावर आजवर अनेक खेळाडूंची कहाणी बघता आली. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सारख्या अनेक दिग्गज खेळाडूंवर बायोपिक येऊन गेले. त्यातच आता आणखी एका बायोपिकची भर पडणार आहे. श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या आयुष्यावर आधारित बायोपिक तुमच्या भेटीला येणार आहे.
फिरकीपटू मुरलीधरनच्या बायोपिकमध्ये झळकणार हा भारतीय अभिनेता!
आपल्याला रुपेरी पडद्यावर फिरकीचा जादुगार म्हणून ख्याती असलेल्या मुरलीधरनच्या आयुष्याची कहाणी पाहता येणार आहे. या बायोपिकचे दिग्दर्शन एमएस श्रीपती करणार असून मुरलीधरनच्या भूमिकेत तमिळ सुपरस्टार अभिनेता विजय सेतुपती दिसणार आहे. हा चित्रपट मुख्यत: तमिळ भाषेत असेल. त्यानंतर तो इतर भाषेत प्रदर्शित करण्यात येईल.
मुरलीधरनला या चित्रपटाबद्दल विचारले असता तो म्हणाला, मला हे खूप गौरवास्पद वाटत आहे. माझी भूमिका विजय सारखा दिग्गज अभिनेता साकारत आहे. या चित्रपटाच्या टीमसोबत मी संपर्कात असून या चित्रपटाच्या निर्मितीच्या प्रिक्रियेत सहभागी आहे.
