
बंगळुरू: मंगळवारी कर्नाटक विधानसभेत काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) आमदारांच्या बंडखोरी नाट्यानंतर विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले. यामध्ये कुमारस्वामी सरकारचा ९९ विरुद्ध १०५ अशा मतांनी पराभव झाल्यानंतर कर्नाटकातील आपल्या एकमेव आमदाराला बसपा प्रमुख मायावती यांनी पक्षातून निलंबित केले. बसपाचे एन. महेश हे आमदार आहेत. ते विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावेळी गैरहजर होते. पक्षाकडून यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
कर्नाटकमधील एकमेव आमदाराची मायावतींकडून हकालपट्टी
ट्विटरवरून यासंदर्भात माहिती मायावती यांनी दिली. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावेळी एन.महेश यांनी कुमारस्वामी सरकारच्या बाजूने मतदान करण्याच्या पक्षादेशाचे उल्लंघन केले. यावेळी ते सभागृहात उपस्थित नव्हते. ही गोष्ट पक्षाने गांभीर्याने घेतली असून तातडीने त्यांना बडतर्फ करण्यात येत असल्याचे मायावती यांनी सांगितले.
२२४ जागांच्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेस-जेडीएस यांनी युती करून सरकार स्थापन केले होते. त्यामुळे निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरुनही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी काँग्रेस-जेडीएसच्या १६ आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे कुमारस्वामी सरकारला बहुमत गमवावे लागले.
