‘खानदानी शफाखाना’चा दुसरा ट्रेलर रिलीज


लवकरच ‘खानदानी शफाखाना’ चित्रपटातून बॉलिवूडची बिनधास्त गर्ल सोनाक्षी सिन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच विनोद आणि वेगळ्या विषयावर आधारित या चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. एका गंभीर विषयासोबतच मनोरंजनाचा तडका असणारा हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस चांगला उतरला होता.

नुकताच या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये तुम्हाला आपल्या पूर्वजांची संपत्ती नावावर करून घेण्यासाठी ६ महिने त्यांचे सेक्स क्लिनीक चालवण्याची वेळ सोनाक्षीवर येते. अशात सोनाक्षी कशा प्रकारे या गोष्टी हाताळते आणि यादरम्यान होणारे अनेक विनोदी संवाद पाहायला मिळतात.

हा विषय समाजात बोलण्यास लोक लाजतात, अशात एक मुलगी सेक्स क्लिनीक चालवते, यावरून तिच्यावर होणारी टीका यात दिसते. या विषयावर लोकांनी खुलेपणाने बोलावे यासाठी, बात तो करो, असे वारंवार म्हणताना या दुसऱ्या ट्रेलरमध्ये सोनाक्षी आपल्याला पाहायला मिळते. चित्रपटाची कथा नेहमीच्या रटाळ प्रेमकथांपेक्षा वेगळी आणि विनोदी असल्याने प्रेक्षकांना काहीसं वेगळेपण या चित्रपटात पाहायला मिळेल हे नक्की. शिल्पी दासगुप्ता द्वारा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार, महावीर जैन आणि म्रद्यदीप सिंह लांबा यांनी केली आहे. हा चित्रपट येत्या २ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Leave a Comment