बॉक्स ऑफिसवर ‘सुपर ३०’ची सेंच्युरी


दोन आठवड्यांपूर्वी गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘सुपर ३०’ चित्रपट रिलीज झाला. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद ऋतिक रोशनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाने आता बॉक्स ऑफिसवर सेंच्युरी झळकवत १००.५८ कोटींची कमाई केली आहे.


प्रेक्षकांना सामान्य विद्यार्थ्यांची असामान्य स्वप्न पूर्ण करण्यात मोलाचे योगदान असणाऱ्या आनंद कुमारांची कथा चांगलीच भावली आहे. मुंबईत या चित्रपटाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईत चित्रपटाने ३१.४९, दिल्लीत २०.६६, पंजाबमध्ये ८.७७, राजस्थानात ४.६३, बिहारमध्ये ३.५९ तर बंगालमध्ये ५.८५ कोटींची कमाई केली आहे.

या चित्रपटाने प्रदर्शनानंतर पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर ७५.८५ कोटींचा गल्ला जमावला तर दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने २४.७३ कोटींची कमाई केली. विद्यार्थ्यांसाठी जिद्द आणि आत्मविश्वासाचे उदाहरण असणारा हा चित्रपट राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यात करमुक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment