18 वर्षांपूर्वी अपहरण झालेला मुलगा फेस अॅपमुळे सापडला !


फेसअॅप वापरून वय वाढल्यावर आपण कसे दिसू याचे फोटो सध्या सोशल मीडिया नेटवर्किंग साईट फेसबुकवर युजर्सकडून शेअर केले जात आहेत. हे सर्वकाही एका आर्टीफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने होत आहे. जरी मनोरंजन म्हणून फेसबुकवर याकडे बघितले जात असले तरी 18 वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या मुलाचा यामुळे शोध लागला आहे.

18 वर्षांपूर्वी चीनमध्ये एका कुटुंबातील अपहरण झालेला मुलगा फेसअॅपमुळे परत मिळाला. मुलाचे तीन वर्षांचा असताना अपहरण झाले होते. फेसअॅपचा वापर करून पोलिसांनी मुलाच्या जुन्या फोटोवरून आताचा फोटो तयार केला. तो त्यानंतर आता कसा दिसत असेल याचा अंदाज लावून शोधमोहिम सुरु केली.

ज्या AI तंत्रज्ञानाचा वापर चिनी पोलिसांनी केला ते चीनच्या टेक आणि इंटरनेट कंपनीने तयार केले आहे. लहान मुलाच्या फोटोवरून ते या तंत्रज्ञानाच्या आधारे आता कसे दिसत असतील हे दिसते. त्यानंतर या फोटोवरून तपास अधिकाऱ्यांनी फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाच्या आधारावर पडताळणी केली.

जवळपास 100 लोकांचा तपास सॉफ्टवेअरच्या मदतीने करण्यात आल्यानंतर मुलाचा शोध लागला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या झेंग झेनहाई यांनी म्हटले की, त्या मुलाला जेव्हा भेटलो तेव्हा त्याला अपहरण झाल्याचे काहीच माहिती नव्हते. त्याची डीएनए टेस्ट केल्यानंतर सर्व काही समोर आले.

2001 मध्ये विफेंग नावाचा मुलगा बेपत्ता झाला होता. तो त्याच्या वडिलांच्या कन्स्ट्रक्शन साइटवर त्यांच्यासोबत गेला होता. तेव्हा खेळत असताना तिथून अपहरण झाले होते. ज्यांनी गेल्या 18 वर्षांत त्याचा सांभाळ केला त्यांचे आभारही विफेंगच्या वडिलांनी मानले.