पाकिस्तानी अभिनेत्री बरळली, म्हणते कुलभूषण यांना वाघा बॉर्डरवर फासावर लटकवा


मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकत असते. पण आता केलेल्या वक्तव्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. कुलभूषण जाधव यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेले ट्विट वीणाला चांगलेच महागात पडणार आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीची मागणी वीणा ट्विट करून करत आहे. नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर केलेल्या या मागणीनंतर चांगलेच धारेवर धरले आहे.

निवृत्त भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. पाकिस्तानी न्यायालयाने त्यांना ठोठावलेल्या फाशीचा पुनर्विचार करावा, असा निकाल ‘द हेग’मधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला. भारताचा हा एक मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे.


दरम्यान, पाकिस्तानी जनतेमध्ये या निर्णयानंतर नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. वीणाच्या ट्विटमधून याचा प्रत्यय आला, भारतीय जनतेने तिच्या वादग्रस्त ट्विटनंतर तिला चांगलेच खडेबोल सुनावले आहे. कुलभूषण जाधव यांचे काही फोटो पोस्ट करत, कॅप्शनमध्ये तिने दहशतवादी आणि खूनी कुलभूषण जाधव यांच्या प्रती कोणत्याही प्रकारची सहानूभुती दाखवता कामा नये. जे तुम्ही पेराल तेच उगवेल. असे लिहले आहे.

इतक्यावरच न थांबता वीणाने वाघा बॉर्डरवर कुलभूषण जाधव यांना फाशी देण्यात यावी असे ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तिला यानंतर नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. वीणा ‘बिग बॉस ४’ शोच्या माध्यमातून चांगलीच प्रकाशझोतात आली होती. तिचे नाव याच दरम्यान अस्मित पटेलसोबत जोडण्यात आले होते. या दोघांच्या नात्याच्या त्यावेळेस चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या.

Leave a Comment