सॅमसंग ए ८० भारतात ४८ हजारात मिळणार


सॅमसंगने त्यांचा गॅलेक्सी सिरीज मधील ए ८० स्मार्टफोन रोटेटिंग कॅमेरा सेटअप सह भारतीय बाजारात लाँच केला आहे. या फोनचे ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजचे सिंगल व्हेरीयंट भारतात सादर केले गेले असून त्याची किंमत ४७९९० रुपये आहे. प्रीबुकिंग २२ ते ३१ जुलै या काळात करता येणार आहे. सर्वप्रथम हा फोन एप्रिल मध्ये सादर केला गेला होता. रोटेटिंग कॅमेरा सेटअप आणि बेजललेस डिस्प्लेमुळे तो ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे असे कंपनीचे म्हणणे आहे.

या फोनसाठी ६.७ इंची फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले असून डॉल्बी अॅटमॉस सराउंड साउंडचा अनुभव युजरला मिळणार आहे. सुपरस्टेडी मोड व लाइव फोकस मोड प्रीलोडेड फिचर मध्ये आहेत. अँड्राईड ९.० पाय ओएस वनयुआयसह अस्डून ४८ + ८ एमपीचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी ३७०० एमएएचची बॅटरी अशी त्याची अन्य फिचर आहेत.

प्रीबुकिंग करणाऱ्यांना वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट मोफत दिली जाणार आहे तसेच सिटी बँक क्रेडीट डेबिट कार्डवरून खरेदी करणाऱ्याला ५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. एंजल गोल्ड, घोस्ट व्हाईट आणि फँटम ब्लॅक अश्या रंगात हा फोन १ ऑगस्टपासून उपलब्ध होत आहे.