ठरले… या दिवशी होणार चांद्रयान 2 चे प्रक्षेपण


नवी दिल्ली – 15 जुलैच्या मध्यरात्री अवकाशात भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम चांद्रयान 2 झेपावणार होते. पण हे उड्डाण काही तांत्रिक दोषामुळे रद्द करण्यात आले होते. पण ही तांत्रिक अडचण आता दूर करत इस्त्रोचे संशोधक पुन्हा चांद्रयान 2 साठी सज्ज झाले आहेत. इस्त्रोच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चांद्रयान सोमवार 22 जुलै दिवशी दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी आकाशात झेपावण्यासाठी सज्ज झाले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून त्याचे प्रक्षेपण होणार आहे. यापूर्वीही चांद्रयान उड्डाणाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले होते. संशोधकांना 15 जुलैच्या रात्री उड्डाणाच्या तासाभरापूर्वी तांत्रिक दोष समजला होता. त्यामुळे चांद्रयान उड्डाण रद्द करून लवकरच नवी तारीख जाहीर करू असे इस्त्रोकडून सांगण्यात आले होते.

चांद्रयान मोहिमेमध्ये 13 पेलोड आणि 8 ऑर्बिट, 3 लॅन्डर आणि दोन रोव्हर असतील. जीएलएसव्ही मार्क 3 (GSLVMKIII) प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण होणार आहे. हे यान सुमारे 52 दिवसांचा प्रवास करून चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणार आहे. तेथील खनिजांचा अभ्यास केला जाणार आहे. चंद्राच्या या भागावर पहिल्यांदाच संशोधन होणार असल्याने भारतासह जगभरातून या मोहिमेबददल मोठ्या अपेक्षा आहेत.