
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी २४ लाख रुपये घेतले होते. पण त्या कार्यक्रमाला हजर न राहिल्यामुळे तिच्या विरोधात उत्तर प्रदेशातील कटघर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कलम ४२० आणि ४०६ अंतर्गत तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाक्षी सिन्हाच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल
या प्रकरणाच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेशातील मोरादाबादचे पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत. जुहू येथील सोनाक्षीच्या घराला पोलिसांनी भेट दिली. पण ती घरी नसल्यामुळे त्यांना खाली हात परतावे लागले. जुहू पोलिसांच्या सहकार्याने युपी पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. सोनाक्षीचा जवाब घेण्यासाठी पोलीस अजून मुंबईतच थांबले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सोनाक्षीची भेट घेण्यासाठी पोलीस आज पुन्हा प्रयत्न करतील. सोनाक्षीवर लावण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असून तिला बदनाम करण्याचा हा हेतू असल्याचे तिच्या मॅनेजमेंटचे म्हणणे आहे. सोनाक्षी सध्या हैदराबादमध्ये सलमान खानसोबत ‘दबंग ३’ चे शूटींग करीत असल्याचे समजते.
