वेबसिरीजच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार प्रिया आणि उमेश


मराठी सिनेसृष्टीतील ‘क्युट कपल’ अर्थात प्रिया बापट आणि उमेश कामत सात वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर आता ‘आणि काय हवं’ या वेबसिरीजच्या माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या दोघांची केमिस्ट्री ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिनही उत्तमरित्या जुळून येते असल्याचे आपल्या सर्वांनाच माहीत असल्यामुळे ते प्रेक्षकांची मने या वेबसिरीजमधूनही नक्कीच जिंकतील. या वेबसिरीजमध्ये प्रिया ‘जुई’ची तर उमेश ‘साकेत’ची व्यक्तिरेखा साकारत आहे.

वैवाहिक जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जात असतानाच ते दर दिवशी एकमेकांच्या नव्यानं प्रेमात पडताना आपल्याला दिसणार आहेत. वेबसिरीजबद्दल बोलताना उमेश म्हणतो, आम्ही सात वर्षांपूर्वी एकत्र काम केले होते. एक मालिका, एक व्यावसायिक नाटक आणि त्यानंतर ‘टाईम प्लीज’ हा चित्रपट, अशा विविध माध्यमांमधून प्रिया आणि मी प्रेक्षकांच्या भेटीला आलो. मात्र त्यानंतर बराच काळ आम्ही एकत्र काम केलं नाही. परंतु कालांतराने आम्हालाही याची जाणीव झाली, की आपण एकत्र काम केले पाहिजे.

आम्हाला काही प्रोजेक्ट्सबाबत विचारणाही करण्यात आली. पण एवढ्या वर्षांच्या कालावधीनंतर एकत्र पडद्यावर झळकण्यासाठी आम्हाला ते विषय तितकेसे भावले नाहीत. या वेबसिरीजबद्दल याचदरम्यान अनिश जोग आणि वरुण नार्वेकर यांनी आम्हाला विचारणा केली. त्यांची संकल्पना ऐकल्यानंतर, त्या क्षणी मनात आले, की एवढी वर्षं थांबल्याचा निश्चितच फायदा झाला.

लग्नानंतर घेतलेले पाहिले घर, पहिली गाडी, एकत्र साजरा केलेला पहिला सण अशा लग्नानंतर एकत्र केलेल्या अनेक ‘पहिल्या’ गोष्टींचं अप्रूप काही औरच! आणि या वेबसिरीजमध्ये हेच लग्नानंतरचे छोटे छोटे सुखद क्षण दाखवण्यात आले आहेत. तुम्हीही ही वेबसिरीज बघताना नकळत तुमच्या आयुष्यातील या अमूल्य आठवणींना उजाळा द्याल.

‘मुरांबा’ फेम वरूण नार्वेकर दिग्दर्शित, अनिश जोग, रणजित गुगळे निर्मित ‘आणि काय हवं’ ही सहा भागांची वेबसिरीज १६ जुलैपासून एमएक्स प्लेयरवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रियाने यापूर्वी नागेश कुकनूर दिग्दर्शित सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसिरीज केली होती प्रियाच्या बोल्ड दृष्यमुळे जी विशेष गाजली.

Leave a Comment