
मुंबई – भारतीय रिझर्व बँकेचे आगामी त्रैमासिक धोरण मौद्रीक धोरण समितीच्या ३ दिवसीय बैठकीनंतर जाहीर करण्यात आले आहे. यावेळी रेपो रेटमध्ये पाव टक्के कपात करण्यात आली असून ६ टक्क्यांवरून रेपो रेट ५.७५ टक्के करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात
२०१९-२० या आर्थिक वर्षासाठी त्रैमासिक मौद्रीक धोरण समिक्षा बैठक रिझर्व बँकेचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील ६ सदस्यीय मौद्रीक धोरण समितीने ३ जून रोजी सुरू केली होती. या बैठकीच्या चर्चेनंतर आज आरबीआयचे रेपो रेट जाहीर करण्यात आले. मौद्रीक धोरण समितीची लोकसभा निडवणुकीच्या निकालानंतर ही पहिलीच बैठक होती.
रेपो रेटमध्ये कपात केल्याने गृहकर्जांसह वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्च २०१९ नंतर आतापर्यंतची रेपो दरातील सलग तीसरी कपात आहे. अर्थव्यवस्थेला उर्जितावस्था देण्यासाठी अधिकाधिक कर्जवाटप करून लोकांची क्रयशक्ती वाढवण्यावर सरकार भर देत आहे.
