पाकिस्तानात फोफावणारी आणखी एक क्रांती – पश्तुन चळवळ


पाकिस्तानच्या वायव्येला असलेल्या प्रांतात सध्या बंडाळी माजली असून तिथे मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. पाकिस्तानी लष्कराला तिथे भयंकर विरोधाला सामोरे जावे लागत आहे. दोन आठवड्यांपूर्वी (26 मे रोजी) पाकिस्तानी सैन्य आणि पश्तून राष्ट्रवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांत प्रत्यक्ष सशस्त्र संघर्ष झाला. त्यात कमीत कमी 13 लोक मरण पावले आणि पाच सैनिकांसह 25 जण जखमी झाले. अफगाणिस्तानच्या सीमेजवळील उत्तर वझिरिस्तान भागातील खार कमार नाक्यावर ही घटना घडली.

विशेष म्हणजे पाकिस्तानी संसदेचे सदस्य असलेल्या दोन पश्तून नेत्यांनी या संघर्षाचे नेतृत्वकेले. अली वजीर आणि मोहसिन डावर असे या संसद सदस्याचे नाव असून ते पश्तून तहाफूज मूव्हमेंट (पीटीएम) या पक्षाचे नेते आहेत. खार कमार तपासणी नाक्यावर हल्ला केल्याबद्दल पाकिस्तानी सैन्याने या दोन्ही नेत्यांना अटक केली.

गेल्या दोन वर्षांत पीटीएमने मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळविले असून पक्षाच्या सभांमध्ये हजारो-लाखो लोक जमत आहेत. पाकिस्तानच्या मार्फत अमेरिकेने राबविलेल्या दहशतवादविरोधी युद्धाला या कार्यकर्त्यांचा विरोध असून त्यामुळे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील पश्तून भागांचा विनाश झाला आहे, असे त्यांचे मत आहे.दहशतवादविरोधी युद्धाच्या नावाखाली पश्तून प्रांतामध्ये गैर-कायदेशीर हत्या आणि वाट्टेल त्याला अटक करण्याचे सत्र थांबवावे, अशी पीटीएमची मागणी आहे. या चळवळीला हजारो पश्तून लोकांचा पाठिंबा मिळाला असून पाकिस्तानी सैन्य आणि जिहादी या दोघांनीही आमच्या प्रांताचा नाश केला आहे, असे त्यांचे मत आहे.

वास्तविक 1947 मध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हापासून पश्तून प्रांताचा मुद्दा हा पाकिस्तानसाठी संवेदनशील ठरला आहे. वायव्य सरहद्द प्रांत हा अफगाण–पाक सीमेवर आहे व 1893 साली मॉर्टिमर ड्यूऱ्हँड या इंग्रजी सनदी अधिकाऱ्याने साम्राज्याच्या सोयीने सीमेची रेषा नकाशावर आखली. त्यामुळे अफगाणिस्तान व पाकिस्तानातील पश्तून जमातींचे कृत्रिम विभाजन झाले. मुळातच पुश्तू किंवा पश्तो ही अफगाणांची भाषा आहे. अफगाण (फार्सी अफघान) हे इराणी लोकांनी दिलेले नाव असून अफगाण लोक स्वतःला ‘पश्तून’ (पश्तान) म्हणवतात. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये पश्तून लोकांची संख्या मोठी आहे.

हा सर्व भाग आपल्या संपूर्ण वर्चस्वाखाली आणून शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करावा, यासाठी ब्रिटिशांनी 1858 ते 1902 पर्यंत अनेक मोहिमा काढल्या; पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले. शेवटी टोळ्यांना खंडणी देऊन वायव्य सरहद्द प्रांतात शांतता ठेवण्याचे धोरण ब्रिटिशांनी स्वीकारले. सन 1919 पासून या टापूस सरहद्द गांधी अब्दुल गफारखानांचे नेतृत्व लाभले व त्यांच्या खुदाई खिदमतगार संघटनेने भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात मोलाची कामगिरी बजावली. जिनांचा द्विराष्ट्रवाद मान्य नसल्याने खुदाई खिदमतगारांचा भारताच्या फाळणीस विरोध होता, तसेच फाळणी अटळ झाल्यास भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्याचे दोनच पर्याय पठणांना न ठेवता पठाण स्वायत्ततेचा म्हणजे पख्तुनिस्तानचा तिसरा पर्याय त्यांच्यापुठे ठेवावा, अशी त्यांची मागणी होती.

म्हणूनच एखादा पश्तून बहुसंख्यक स्वतंत्र देश अस्तित्वात येऊ शकतो, ही पाकिस्तानला नेहमीच भीती राहिली आहे. पाकिस्तानच्या पेशावर विभागापासून, विशेषतः पूर्वीच्या प्रत्यक्ष ब्रिटिश अंमलाखालील सहा जिल्ह्यांच्या पलीकडील ड्युरँड रेषेपर्यंतचा मुलूख व अफगाण हद्दीतील ड्युरँड रेषेच्या परिसरातील प्रदेश या हे स्वतंत्र पख्तुनिस्तान निर्माण होऊ शकते. ब्रिटिशांच्या वेळी वायव्य सरहद्द प्रांतातील दोन तृतीयांश भूभाग पठाणी टोळ्यांच्या वर्चस्वाखाली होता. “पश्तुनीस्तान” किंवा पख्तुनीस्तानची ही चळवळ मुख्यतः उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष नेत्यांनी चालवली होती आणि तिला अंकुश लावण्यासाठी पाकिस्तान सरकारने या क्षेत्राचे इस्लामीकरण केले, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गेल्या महिन्यात पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी पीटीएम पक्षाचे नेतृत्व देशाच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप केला होता. तसेच पीटीएमला भारतीय आणि अफगाण गुप्तचर संस्थांकडून पैसे मिळत आहेत, असाही त्यांनी आरोप केला. मात्र पश्तून चळवळीच्या नेत्यांनी हे आरोप खोडून काढले आहेत. नुकतीच पश्तीन याने जर्मनीच्या डॉयट्शे वेले या वाहिनीला मुलाखत दिली. त्यात त्याने पाकिस्तान सरकार आमच्या लोकप्रियतेला भीत असल्याचा दावा केला.

“संसदेत पीटीएमचे दोन निर्वाचित प्रतिनिधी असून ते आमच्या सरकारी संस्थांच्या धोरणांविरुद्ध बोलतात. पाकिस्तानी सैन्याला ते आवडत नाही. विधिमंडळातून अशा टीकाकारांना बाहेर काढण्याचा सैन्य प्रयत्न करत आहे,” असे त्याने म्हटले आहे.

आमच्या प्रांतासाठी संसदेत जागा वाढवल्या पाहिजेत, अशी आदिवासी भागातील लोकांची जोरदार मागणी आहे जेणेकरून त्यांना चांगले प्रतिनिधित्व मिळेल. आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये नेहमीप्रमाणे गडबड करण्याची सेनेची योजना असून त्याला पीटीएम खोडा घालण्याची शक्यता आहे. म्हणूनच त्यांनी दावर यांना अटक केली, असे पश्तीन म्हणतात.

एकुणात आधीच बलुचिस्तान चळवळीवरून गोंधळलेल्या आणि आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तान सरकारला पश्तून चळवळीमुळे आणखी एक तगडे आव्हान उभे राहत आहे.

Leave a Comment