
लंडन – बसल्या जागी ५०५ किलो वजन उचलून ब्रिटनमधील दिव्यांग माजी सैनिक मार्टिन टॉय यांनी विश्वविक्रम रचला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये त्यांच्या या कामगिरीची नाेंद झाली अाहे. काहीही दिव्यांग व्यक्तीदेखील करू शकते. काेणत्याही प्रकारे अाम्ही दुर्बल नाहीत, हे जगाला दाखवून देण्यासाठी हे मला करावे लागले, असे टाॅय यांनी ही कामगिरी केल्यानंतर सांगितले. गत ६ मे राेजी ही स्पर्धा इंग्लंडच्या व्राक्सल या गावात आयाेजित झाली.

या संदर्भात स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार ब्रिटिश लष्करात मार्टिन हे लान्स कॉर्पोरेल हाेते व अनेक युद्धे त्यांनी पाहिली आहेत. ते २१ व्या वर्षी लष्करात भरती झाले हाेते. त्यांना नाेकरीत असताना ऑगस्ट २००९ मध्ये अफगणिस्तानमध्ये नियुक्ती मिळाली हाेती. तेथे काबूलमध्ये एका बॉम्बरने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांना एक पाय गमवावा लागला.
