
एक्झिट पोलच्या संदर्भात अभिनेता विवेक ओबेरॉय याने केलेल्या ट्विटचा सध्या चांगलाच वनवा पेटला आहे. अभिनेता विवेक ऑबेरॉय याने या ट्विटमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिच्या संदर्भात वापरलेले छायाचित्र आणि त्यावरील कमेंटमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. राज्य महिला आयोगाने देखील याची दखल घेतली आहे. त्याला यासंदर्भात नोटीस बजावली आहे. याबाबतची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे. विवेकने शेअर केलेले ट्विट हे क्रिएटिव्हीटी नसून एका महिलेचा अनादर करणारे आहे. तो एक जबाबदार अभिनेता आहे. त्याच्याकडून अशा वर्तणुकीची अपेक्षा नव्हती. यासंदर्भात त्याला नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे रहाटकर यांनी म्हटले आहे.
विवेक ओबेरॉयला ‘ते’ ट्विट भोवले, राज्य महिला आयोगाने बजावली नोटीस
आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो विवेक ओबेरॉयने शेअर केला आहे. ऐश्वर्या सलमान खान, विवेक आणि अभिषेकसोबत यामध्ये दिसत आहे. हा ऐश्वर्याच्या वैयक्तिक आयुष्यावर मीम असून ऐश्वर्या-सलमानला यामध्ये ओपिनियन पोल, ऐश्वर्या-विवेकला ऐक्झिट पोल आणि ऐश्वर्या-अभिषेक यांच्या जोडीला रिझल्ट दाखवण्यात आला आहे. विवेकने हा फोटो शेअर करून यावर कॅप्शनही दिले आहे. क्रिएटिव्ह, येथे कोणतेच राजकारण नाही, हेच आयुष्य असल्याचे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. सोशल मीडियावर त्याच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरले आहे.
