
चेन्नई – मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने मक्कल निधी मय्यमचे अध्यक्ष कमल हसन यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता, असे वादग्रस्त वक्त्व्य त्यांनी केले होते. त्यांच्यावर याप्रकरणी प्रक्षोभक भाषण करुन जनतेमध्ये जातीय सलोखा बिघडवणारे वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
‘त्या’ वक्तव्याप्रकरणी कमल हसन यांना अटकपूर्व जामीन
न्यायमूर्ती बी. पुगालेंधी यांनी त्यांचा अटकपूर्व जामीन कमल हसन यांचे संपूर्ण भाषण विचारात घेऊन तसेच ते एका नोंदणीकृत राजकीय पक्षाचे नेते असल्याने मंजूर केला. त्याचबरोबर हसन यांनी पुढील पंधरा दिवसात करुर येथील न्यायालयात हजेरी लावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. भादंवि कलम १५३ (ए), २९५ (ए) नुसार हसन यांच्यावर प्रक्षोभक भाषण करुन जनतेमध्ये जातीय सलोखा बिघडवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
केवळ गोडसेबाबत आपण हे वक्तव्य केले होते. ते सर्व हिंदूसाठी नव्हते, असे स्पष्टीकरण हसन यांनी न्यायालयाला दिले. कमल हसन यांनी चेन्नईतील अर्वाकुरची येथील प्रचारावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण केले होते. त्या वेळी, नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता, असे म्हटले होते. या वक्तव्यानंतर काहींनी त्यांना पाठिंबा दिला होता, तर काहींनी त्यांच्यावर कडाडून टीका केली होती.
