
गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. आता मराठी चित्रपटसृष्टीतही हाच ट्रेंड पाहायला मिळत असल्यामुळेच आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची या बायोपिक चित्रपटांच्या मांदियाळीमध्ये निर्मिती करण्यात येणार आहे. महात्मा फुलें यांच्या जीवनकार्याचा ‘सत्यशोधक’ या बायोपिकमधून उलगडा होणार आहे.
महात्मा फुलें यांच्या जीवनकार्याचा या चित्रपटातून उलगडा होणार
अभिनेता संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे यांची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका संदीप कुलकर्णी वठविणार आहे. तर सावित्रीबाई फुले यांची व्यक्तीरेखा राजश्री देशपांडे साकारणार आहे. या वर्षाअखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अलीकडेच राजश्री देशपांडेची प्रमुख भूमिका असलेली ‘सेक्रेड गेम्स’ आणि संदीप कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेली ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेब सीरिज गाजल्या आहेत. या वेबसिरीज मधील दोघांच्याही अभिनयाचे कौतुक झाल्यानंतर हे दोन्ही कलाकार आता पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. समता प्रॉडक्शन आणि कथाकार एंटरटेन्मेंटने निलेश जळमकर दिग्दर्शित ‘सत्यशोधक’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
