एबी डिव्हिलियर्सला खेळायची आहे विश्वचषक स्पर्धा पण…


मुंबई – मे २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अनेक क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या फॅन्समध्ये अचानक निवृत्तीने घोर निराशा पसरली होती. आता विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्याने विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने त्यासाठी एक अजबच अट ठेवली आहे.

एबीला एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता, की २०२३ मध्ये तो क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळेल का? त्याने या प्रश्नाला उत्तर देताना क्रिकेटमध्ये पुनरागमनाची इच्छा व्यक्त केली. त्याने त्यासाठी एक अटही बोलून दाखवली आहे. डिव्हिलियर्स म्हणाला, मी २०२३ सालचा विश्वचषक खेळेन पण त्यात महेंद्र सिंह धोनीपण खेळला पाहिजे. एबीने हे गंमतीत म्हटले असले, तरी क्रिकेटप्रेमींना या दोन दिग्गज खेळाडूंना एकत्र खेळताना पाहायला आवडेल.

११४ कसोटी आणि २२८ एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या या दिग्गज फलंदाजांने प्रतिनिधीत्व केले आहे. एबीने कसोटीत ८ हजार ७६५ तर एकदिवसीय मध्ये ९ हजार ५७७ धावा केल्या आहेत. तसेच ७८ टी-२० सामन्यात १ हजार ६७२ धावा केल्या आहेत. यात एकूण ४७ आंतरराष्ट्रीय शतकांचा समावेश आहे. सध्या तो जगभरातील विविध टी-२० लीगमध्ये खेळताना दिसून येतो. नुकत्याच झालेल्या आयपीएल २०१९ मध्ये त्याने बंगळुरूकडून चांगली कामगिरी केली आहे.

Leave a Comment