
नवी दिल्ली – राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी यंदा सोशल मीडियाचा जोरदार वापर केला. गुगलसह फेसबुकवरील ऑनलाईन जाहिरातीसाठी राजकीय पक्षांनी फेब्रुवारी व मे दरम्यान ५३ कोटी खर्च केले आहेत.फेसबुक व गुगलच्या ऑनलाईन डॅशबोर्डवरून ही माहिती समोर आली आहे.
गुगलसह फेसबुकवरील जाहिरातींवर राजकीय पक्षांनी केला एवढा खर्च
फेसबुक अॅड लायब्ररी अहवालाच्या माहितीनुसार १.२१ लाख राजकीय जाहिराती फेब्रुवारी ते १५ मे दरम्यान दाखविण्यात आल्या आहेत. २६.५ कोटी रुपये त्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. तर फेब्रुवारी ते १९ मेपर्यंत गुगल, यू ट्यूब आणि इतर माध्यमांवर १४ हजार ८३७ जाहिरातींसाठी २७.३६ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
२ हजार ५०० जाहिरातींसाठी सत्ताधारी भाजपने ४.२३ कोटी खर्च केले आहेत. ‘माय फर्स्ट व्होट फॉर मोदी’, ‘भारत के मन की बात’ आणि ‘नेशन विथ नमो’ या पेजवर या जाहिराती दाखविण्यात आल्या आहेत. तर भाजपने गुगलवरील जाहिरातींसाठी १७ कोटी रुपये खर्च केले आहेत.
फेसबुकवरील ३ हजार ६८६ जाहिरातीसाठी काँग्रेसने १.४६ कोटी खर्च केले आहेत. तर गुगलवरील ४२५ जाहिरातीसाठी २.७१ कोटी खर्च करण्यात आले आहेत. तृणमुल काँग्रेसने फेसबुकवरील जाहिरातींसाठी २९.२८ लाख रुपये खर्च केले आहेत. आम आदमी पक्षाने १७६ जाहिरातींसाठी १३.६२ लाख रुपये खर्च केले. या जाहिराती फेसबुक पेजवर दाखविण्यात आल्या आहेत. गुगलच्या पॉलिटिकल अॅड डॅशबोर्डवरील माहितीनुसार आम आदमी पक्षाने कॅम्पेनसाठी २.१८ कोटी खर्च केले आहेत. गुगल आणि फेसबुकने राजकीय जाहिरातींमधील पारदर्शकता दाखविण्यासाठी ऑनलाईन डॅशबोर्ड उपलब्ध करून दिले आहेत.
