किळसवाण्या कॉक्रोच चॅलेंजची जगभरात वाढती क्रेझ


नवी दिल्ली – जगभरातील अनेकांना पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर पबजी या गेमने वेड लावले आहे. सध्याच्या पबजीची क्रेझ जगभरात पाहायला मिळत आहे. या गेमसाठी जगभरातील तरुणाई अक्षरश: वेडी झाली आहे. पण आता सोशल मीडियावर कॉक्रोच चॅलेंज (Cockroach Challenge) जोरदार व्हायरल होत आहे. खरे तर कॉक्रोच चॅलेंज हे नाव वाचून सुरुवातीला थोडा धक्का बसला असेल किंवा मग ते किळसवाणे वाटत असले तरी या चॅलेंजची सध्या जगभरात क्रेझ पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्यांना चॅलेंज दिले तर ते व्हायरल व्हायला फारसा वेळ लागत नाही. तसेच काहीसे कॉक्रोच चॅलेंजबाबतही झाले आहे. अनेकजण कोणताही विचार न करता हे चॅलेंज स्विकारत आहेत. या चॅलेंजमध्ये चॅलेंज स्विकारणाऱ्याने आपल्या चेहऱ्यावर झुरळ ठेवून एक सेल्फी काढायचा आहे. तो सेल्फी त्यानंतर फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल नेटवर्कींग साईट्सवर पोस्ट करणे अपेक्षित आहे.

20 एप्रिल रोजी झुरळासोबतचा एक फोटो म्यानमारमधील यानगाँग येथे राहणाऱ्या अ‍ॅलेक्स ऑग या तरूणाने पोस्ट केला होता. चेहऱ्यावर झुरळ ठेवून अ‍ॅलेक्सने काढलेला सेल्फी फेसबुकवर अपलोड केला होता. त्याने या फोटोसोबत नवीन चॅलेंज, तुम्ही करू शकता का? असे कॅप्शन लिहिल्यानंतर हे चॅलेंज सुरू झाले आहे. अ‍ॅलेक्सचा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर झाला असून त्यानंतर कॉक्रोच चॅलेंजला सुरूवात झाली.

अनेकांनी अ‍ॅलेक्स ऑगच्या पोस्टनंतर कॉक्रोच तोंडावर ठेवून काढलेले फोटो पोस्ट करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी फेसबुक आणि ट्वीटरवर सारख्या इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर Cockroach Challenge हा शब्द वापरून तसेच हॅशटॅग देऊन तोंडावर झुरळ ठेवलेले फोटो पोस्ट केले आहे. सध्या जगभरात हे कॉक्रोच चॅलेंज जोरदार व्हायरल होत आहे.

Leave a Comment