मुजफ्फरपूरच्या हॉटेलमध्ये सापडली 2 ईव्हीएम व व्हीव्हीपॅट


मुजफ्फरपूर (बिहार) – काल (सोमवार) बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान झाले. दरम्यान 2 ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मुजफ्फरपूरमध्ये मतदान केंद्राजवळील हॉटेलमध्ये सापडले होते. मतदान केंद्रावर याप्रकारामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. ईव्हीएम मशीन हॉटेल परिसरात सापडल्याने त्याची सर्वत्र चर्चा आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी अलोक रंजन घोष यांनी याबाबत सांगितले की, 4 ईव्हीएम मशीन तेथील सेक्टर मजिस्ट्रेट अवदेश कुमार यांच्याकडे राखीव ठेवण्यात आली होती. त्यांचा वापर कोणत्या मतदान केंद्रावर मशीन बंद पडल्यास करण्यात येणार होता. अवदेश कुमार यांच्या गाडीचा चालक घटनेवेळी मतदान करण्यासाठी केंद्रावर गेला होता. अवदेश कुमार हे त्यावेळी जवळच्या हॉटेलमध्ये गेले. त्यांच्या कारमध्ये तेव्हा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन होत्या. मशीन तेथील काही लोकांना दिसल्यानंतर त्यांनी गोंधळ घातला आणि तक्रार करण्यात आली. त्या परिसरात तेव्हा कार्यरत असलेले उप-विभागीय अधिकारी कुंदन कुमार घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तत्काळ त्या मशीन ताब्यात घेतले.

तरीही अशा एखाद्या हॉटेलमध्ये ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन घेऊन जाणे नियमांच्या विरुद्ध असल्याने झाल्याप्रकाराची चौकशी केली जाणार आहे. संबंधित अधिकारी अवदेस कुमार यांना मशीन हॉटेलमध्ये नेल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आल्याचेही अलोक रंजन घोष यांनी सांगितले.

Leave a Comment