मोदींचे मानसिक संतुलन झोप पूर्ण न झाल्यामुळे बिघडले – भूपेश बघेल


रायपूर – उत्तर प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधी पहिल्या क्रमांकाचे भ्रष्टाचारी असल्याचे वक्तव्य केले होते. राजीव गांधींचा जीवनप्रवास भ्रष्टाचारी नंबर वन अशा रुपात संपला, असे ते म्हणाले होते. मोदींना यानंतर मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान झोप पूर्ण न झाल्यामुळे पंतप्रधान मोदींचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी केली असून मानसोपचारांची त्यांना गरज असल्याचे देखील म्हटले आहे.

दिवसभरात फक्त ३ ते ४ तासांची मोदी झोप घेतात. पुरेशी झोप जे घेत नाहीत, त्यांचे मानसिक संतुलन बिघडते. अनेक वर्षांपूर्वीच राजीव गांधीजी हे जग सोडून गेले. त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे उद्गार निवडणुका सुरू असताना काढणे हे मानसिक संतुलन ढासळल्याचे लक्षण असल्याचे बघेल यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

सध्या उघडपणे बोफोर्स घोटाळ्याविषयी मोदी बोलत आहेत. बोफोर्स तोफांच्या स्वीडिश संरक्षण उत्पादकांकडून कराराबदल्यात काही रक्कम मिळाल्याचा आरोप यामध्ये राजीव गांधींवर केला गेला होता. त्यांची १९९१ ला हत्या झाली. या प्रकरणावरून राजीव गांधींचा प्रवास पहिल्या क्रमांकाचे भ्रष्टाचारी म्हणून संपला, असे वक्तव्य मोदींनी केले होते.

Leave a Comment