
अलिकडेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी यांनी शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. बोमण इराणी हे या व्हिडिओत ऑटोरिक्षा चालवणाऱ्या महिलेबरोबर पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओच्या व्हायरल होण्यामागचे कारणही तसेच आहे. कारण, ऑटोरिक्षा चालवणारी ही महिला मराठी मालिकेची अभिनेत्री आहे.
‘ही’ मराठी अभिनेत्री दिवसा अभिनय करून रात्री चालवते ऑटोरिक्षा
दिवसा मराठी मालिकेंमध्ये अभिनय करणारी लक्ष्मी रात्री ऑटोरिक्षा चालवते. रस्त्यावरून जाताना बोमण यांनी तिला ऑटोरिक्षा चालवताना पाहिले. बोमण तिला पाहुन भारावून गेले होते. तिच्यासोबत त्यांनी ऑटोरिक्षातून प्रवास केला. तसेच तिच्याशी मनमोकळेपणाने गप्पाही मारल्या. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लक्ष्मी एक रिअल हिरो असल्याचे म्हटले आहे. तसेच, ती इतरांसाठी प्रेरणा आहे. ती उर्जेचा भरभक्कम स्रोत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तर, लक्ष्मीने या व्हिडिओत बोमण यांना भेटून आपला आनंद शब्दात व्यक्त करता येत नसल्याचे म्हटले आहे. बोमण यांना भेटून लक्ष्मीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही लक्ष्मीचे भरभरून कौतुक केले आहे.
