रेहमानच्या ‘९९ साँग्स’मध्ये झळकणार हा नवोदित चेहरा


आजवर आपल्या गाण्यांनी नवनवे इतिहास रचणाऱ्या संगीतक्षेत्रातील आघाडीचे संगीतकार ए. आर. रेहमान यांनी आता निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवले आहे. प्रेक्षकांच्या भेटीला त्यांच्या निर्मितीखाली तयार होत असलेला ‘९९ साँग्स’ हा पहिला चित्रपट येणार आहे. पण कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत या चित्रपटात झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता होती.

या चित्रपटात इहान भट्ट हा अभिनेता मुख्य भूमिका साकारणार आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात अभिनेत्री मनीषा कोईरालादेखील झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वेश कृष्णमूर्ती करत आहेत.

ए.आर. रेहमान यांच्याकडे संगीतक्षेत्रातील एक उत्तुंग नाव म्हणून पाहिले जाते. त्यांच्या गाण्यांची तरुणाईसह सर्वच वर्गातील श्रोत्यांवर भूरळ पडते. त्यांनी बॉलिवूडसह इतरही सिनेसृष्टीत आजवर अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. आता त्यांनी निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवले आहे. त्यांनी यासाठी जीओ स्टुडिओसोबत हात मिळवला आहे.

हा चित्रपट एक प्रेमकथा असणार आहे. ए. आर. रेहमान यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून हा चित्रपट २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment