
सातारा: एक वादग्रस्त वक्तव्य करून सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे यांनी वाद ओढवून घेतला आहे. सध्या प्रचाराच्यानिमित्ताने ते साताऱ्यातील विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. एका विद्यार्थिनीने अशाच कार्यक्रमात मुलांकडून छेडछाडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार उदयनराजे यांच्याकडे केली. त्यावर त्या विद्यार्थिनीला उदयनराजेंनी मुले मुलींकडे नाहीतर कोणाकडे बघणार?, असा उलट सवाल केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी शिट्ट्या वाजवत आणि गलका करत सभागृह डोक्यावर घेतले. पण सोशल मीडियावर ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी उदयनराजेंवर टीका करायला सुरुवात केली आहे.
आक्षेपार्ह वक्तव्यानंतर उदयनराजेंची सारवासारव
उदयनराजे भोसले यांनी या सगळ्या वादानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी प्रसारमाध्यमांना जबाबदार धरले. काही शब्द कारण नसताना माझ्या नरड्यात कोंबण्याचा प्रयत्न झाला. हा चारित्र्यहनन करण्याचा प्रकार आहे. सोशल मीडियावर माझ्या संवादाचा निवडक भागच व्हायरल झाला आहे. समोरून एखादी व्यक्ती चालत येत असेल तर आपण तिच्याकडे पाहतोच. पण, हे विकृत पद्धतीने होत असेल तर ही गोष्ट वाईट आहे, हेदेखील मी तेव्हाच स्पष्ट केल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
