झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील थुकरटवाडीत आजवर बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी पुन्हा एकदा हजेरी लावली.
आमिर खान आणि किरण राव या शोमध्ये पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेसाठी आले होते. आमिरने यावेळी मुख्य प्रयोजनासोबतच भाऊ कदमबरोबर खूप धमाल-मस्ती केली. भाऊ कदम यावेळी ‘रंगीला’फेम मुन्ना आणि श्रेया बुगडे मिली बनली होती.
आमिर खान आणि भाऊ कदम यांची डान्स जुगलबंदीही यावेळी चांगलीच रंगली. आमिर आणि किरण राव यांनी अगदी मराठमोळी वेशभूषा परिधान केली होती. गावातला माहोल दोघांनीही उभा केला. भाऊच्या रंगीला मुन्नाने नेहमीप्रमाणे सगळ्यांचीच मने जिंकली. आमिर खानचीही हसून हसून मुरकुंडी वळली. त्याने कलाकारांना मनापासून दाद दिली.