बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्येही ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियंका चोप्राने आपल्या उत्कृष्ट अभिनयाची छाप पाडली आहे. तिच्या लोकप्रियतेत त्यानंतर आताही दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. प्रियंकाने 2018 च्या डिसेंबरमध्ये अमेरिकन गायक निक जोनासशी जोधपूरमध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर त्यांनी दिल्ली आणि मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टीही आयोजित केली होती.
बराच काळ बॉलिवूडपासून प्रियंका दूर असून ती सध्या आपल्या संसारात रमली आहे. पण ती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये ‘द स्काय इज पिंक’द्वारे कमबॅक करणार आहे. नुकतीच प्रियंका ‘द स्काय इज पिंक’चं शूटिंग पूर्ण करून आपल्या सासरी परतली. हा चित्रपट pulmonary fibrosis पीडित आयशा चौधरी हिच्या जीवनावर आधारित आहे. प्रियंकासोबतच या चित्रपटात जायरा वसीम आणि फरहान अख्तर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
‘मिस वर्ल्ड 2000’ ते हॉलीवूड अभिनेत्री असा यशस्वी प्रवास करणाऱ्या प्रियंकाच्या यशात आता आणखी एका सन्मानाची भर पडली आहे. आता यूएसए टुडेच्या जगातील सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत प्रियंकाच्या नावाचा समावेश झाला आहे. आता मनोरंजन जगतातील 50 सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत प्रियंका सामील झाली आहे. तिच्यासोबत या यादीत ओपरा विनफ्रे, बियांसे, एलन डी जेनेरस, निकोल किडमन यांचाही समावेश आहे.
मनोरंजन जगतातील 50 सर्वात शक्तीशाली महिलांच्या यादीत समावेश झाल्यावर ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना प्रियंका म्हणाली, माझ्यासोबत या यादीत ज्या महिलांचा समावेश आहे या सर्व महिलांनी आपल्या आयुष्यात संघर्षाचा सामना केला आहे आणि म्हणूनच आज त्या यशाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत.