
तिकीटबारीवर रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटाने भरघोस कमाई केली होती. या चित्रपटाच्या शेवटी आपल्या आगामी सुर्यवंशी चित्रपटाची घोषणा रोहित शेट्टीने केली होती. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहित आणि अक्षय पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.
अक्षयसोबत ‘सूर्यवंशी’मध्ये झळकणार श्रीलंकन बाला
गेल्या महिन्यात या चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. त्यादरम्यान चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. पण त्यावरुन आता पडदा हटवण्यात आला आहे. या चित्रपटात श्रीलंकन बाला असलेली जॅकलीन फर्नांडिस मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार असल्याची चर्चा आहे. सर्वात आधी या चित्रपटासाठी कतरिना कैफ आणि पुजा हेगडे या दोन नावांची चर्चा होती.
या आधीही ‘हाउसफुल’ चित्रपटात अक्षय कुमार आणि जॅकलिन फर्नांडिस ही जोडी एकत्र पहायला मिळाली होती. अजय देवगनचा ‘सिंघम’ आणि रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’ चित्रपटाची झलक ‘सूर्यवंशी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. अक्षय कुमार सध्या ‘केसरी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
