
गुरुग्राम – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लष्कर-ए- तोयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा गुरुग्राममधील बंगला जप्त केला असून कोट्यावधी रुपये या बंगल्याची किंमत असल्याचे समजते.
ईडीने जप्त केला हाफिज सईदचा गुरुग्राममधील बंगला जप्त
या संदर्भातील वृत्त “द प्रिंट” या संकेतस्थळाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार काश्मीरमधील उद्योजक जहूर अहमद शाहर वटाली याच्या मदतीने हाफिज सईदने गुरुग्राममध्ये बंगला विकत घेतला होता. सईदने फलाह-ए- इन्सानियत फाऊंडेशन (एफआयएफ) या संस्थेच्या माध्यमातून या बंगल्यासाठीचे पैसे उभे केल्याचा संशय ईडीला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दहशतवादाला आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी जहूरला अटक झाली होती. हाफिज सईदच्या मालमत्तेचा त्याच्या चौकशीतून उलगडा झाला.
यूएईतून हवालामार्गे बंगल्यासाठीचे पैसे भारतात आल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. बनावट नावांचा वापर करुन हाफिज सईदने भारतात तब्बल 24 ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले आहे. लवकरच उर्वरित मालमत्तांवरही जप्तीची कारवाई केली जाईल, असे ईडीतील सूत्रांनी सांगितले. मालमत्तेच्या खरेदीसाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्यांचा तपशीलही ईडीने गोळा केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
